This Is How India Fights Corona Together!

दिनांक १४ ऑगस्ट २००३ रोजी, जेव्हा न्यूयॉर्कमध्ये दुपारी ४ वाजून १० मिनिटे होत होते, तेव्हा अचानक शहरातील वीज गेली. अमेरिकेत वीज जाण्याची घटना क्वचित कधी तरी होते. म्हणून सगळे जण चकीत झाले. सगळं शहर जणू थांबलं. विजेची समस्या नसल्यामुळे जनरेटर्सची सोय नव्हती. अनेक जण लिफ्टमध्ये अडकले. सगळ्या मेट्रो ट्रेन मध्येच थांबल्या. काही वेळांनी कळालं, फक्त न्यूयॉर्कच नव्हे, तर संपूर्ण ईशान्य अमेरिका अंधारात आहे. न्यूजर्सी, मेरिलँड, कनेक्टिकट, मिशिगन, मॅसेच्युसेट्स, पेनसिल्ह्वानिया अशा अनेक राज्यांमध्ये वीज गायब होती. ही सगळी राज्ये अंधारात होती. तेथील ग्रिड फेल झाली होती. ही परिस्थिती अमेरिकी लोकांसाठी विचित्र होती. काय करावं, हे त्यांना सुचतच नव्हतं. सगळं काही विजेवर अवलंबून होतं. मुलांपासून म्हाताऱ्यापर्यंत, सत्तर / ऐंशी मजली अपार्टमेंटमधील आपल्या घरात जाणं ही एक समस्या होती.

खैर, १४ ऑगस्टची रात्र कशीबशी निघाली. परंतु १५ ऑगस्टला अमेरिकी जनतेच्या धैर्याचा बांध फुटला. ते ओरडू लागले, दुकान लुटू लागले, बिलबोर्ड्स तोडू लागले. एकट्या न्यूयॉर्क शहरात त्या दिवशी ४० हजार पोलिसांची फौज रस्त्यावर आणावी लागली या अराजकतेवर नियंत्रण आणण्यासाठी!

२००३ चा तो नॉर्थईस्ट ब्लॅकआऊट, अमेरिकेच्या इतिहासातील काळा डाग आहे. नंतर २०११ मध्ये जेव्हा कॅलिफोर्नियात ग्रिड फेल झाली, तेव्हा तिथंही काहिसे असेच अराजकतेचे दृश्य होते! आजही न्यूयॉर्कमध्ये हेच घडतंय. मृतदेह पुरण्यासाठी कबरस्थान कमी पडत आहेत. सव्वा लाख लोकांना एकट्या या शहरात लागण झाली आहे. या शहरात ३६०० पेक्षा जास्त लोकांचा विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. लोकं जबरदस्त घाबरली आहेत. मदतीसाठी सगळे जण सरकारवर अवलंबून आहेत. संपूर्ण अमेरिकेची व्यवस्थाच सरकारकेंद्रीत आहे. परंतु या महामारीत सरकार नावाची व्यवस्थाच कोलमडली आहे.

इंग्लंडसुद्धा यापासून दूर नाही. त्याचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांना कोविड-१९ ची लागण झाली आहे आणि रुग्णालयातील आयसीयूमध्ये भरती आहेत. या इवल्याशा देशात ५५ हजारांपेक्षा जास्त जणांना लागण झाली आहे आणि या महामारीमुळे मरणाऱ्यांची संख्या ६२०० च्या पलीकडे गेली आहे. संपूर्ण देश गोंधळलेला आहे. कोण्या काळी जे रोमन साम्राज्य जगातील सर्वात शक्तिशाली साम्राज्य मानले जात होते, तेच आज तुटून पडले आहे. इटलीत परिस्थिती एवढी वाईट आहे, की वर्णन करणं कठीण आहे. एक लाख छत्तीस हजार लागण झालेले आणि १७ हजारांपेक्षा जास्त मृत्यू… हीच अवस्था स्पेनची आहे.

हे सगळे विकसित देश आहेत, प्रगत देश आहेत. ‘मॉडर्न’ देश आहेत. काही प्रमाणात जगाचे भाग्य निश्चित करणारे देश आहेत. आज हे सगळे असहाय आहेत, तुटून पडलेत. यांना या परिस्थितीतून निघण्याचा रस्ता दिसत नाहीये. या सगळ्या देशांमध्ये सोशल सिक्युरिटी आहे. सरकारकेंद्रीत व्यवस्था आहे. मात्र जिथे सरकार स्वतःच ऑक्सिजनवर असेल, तिथे देशाचं काय होणार?

आणि आपला भारत…?

अमेरिकेत ‘दि ग्रेट नॉर्थ ईस्ट ब्लॅकआऊट’ झाल्यानंतर बरोबर दोन वर्षांनी, म्हणजे २६ जुलै २००५ रोजी मुंबईत इतिहासातील सगळा मोठा पूर आला. निसर्गाचे रौद्र आणि क्रुद्ध रूप मुंबईकरांनी पाहिले. सगळं काही ठप्प झालं होतं.

पण, मानवता जीवंत होती. २६ आणि २७ जुलैचे असंख्य उदाहरण मिळतात. यात एकट्या महिला, युवती, मुले जे या महापुरात सापडले होते, त्या सगळ्यांना मुंबईकरांनी आपापल्या घरांत, कार्यालयांत, हॉटेल आणि रुग्णालयात आश्रय दिला. एकही चुकीची घटना घडली नाही. एकही चोरी किंवा लूट झाली नाही. अनेक गरीब कुटुंबांनी या अडकलेल्या प्रवाशांना भोजन दिले, कपडे दिले आणि हिंमत दिली! हा भारत आहे.

माझे अनेक परदेशी मित्र आहेत. त्यापैकी काही जण फोन करून विचारत होते, “तुमच्या देशानं हे सगळं कसं सांभाळलं? एवढा मोठा, एवढा विशाल देश. दाट लोकवस्तीचा. पण केवळ कोविड-१९ ची लागण झालेल्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवलंय, तर सगळ्या देशात कायदा-सुव्यवस्था अगदी व्यवस्थित आहे. एवढ्या मोठ्या देशात लॉकडाऊन करणं शक्य कसं झालं..?”

प्रश्न योग्य आहे. सगळ्या जगात १५ लाख जणांना लागण झालीय. चौऱ्यांशी हजार जण या व्हायरसने मेले आहेत. आणि भारतात लागण झालेल्यांची संख्या आहे – साडे सहा हजार आणि मरणाऱ्यांची संख्या २०६. (‘तब्लिगी जमात’ने हा सगळा तमाशा केला नसता, तर आपल्याकडे लागण झालेल्यांची आणि मृतांची संख्या खूप कमी असती) जगाला वाटतं, की आपण फारसे शिस्तबद्ध नाहीत. पण काही तरी तर आहे आपल्या असण्यात, ज्याच्या मुळं या संकटाचा धैर्याने प्रतिकार करत आहोत.

सगळ्या जगात छोट्या छोट्या देशांनीही पूर्ण लॉकडाऊन केले नाही. चीननेसुद्धा संपूर्ण देशात लॉकडाऊन केले नाही. लंडनची जर्मनीची U आणि S Bahn, स्पेनची मेट्रो ट्रेन आजही धावत आहेत. अमेरिकेत या महामारीच्या प्रकोपाने हजारो जण मरत आहेत. पण ट्रम्प साहेब सगळा देश ठप्प करण्याच्या बाजूने नाहीत. त्यांना वाटतं, की अमेरिकेची सगळी अर्थव्यवस्था यामुळं कोसळेल.

परंतु आपण हा जो निर्णय केला, तो खूप शहाणपणाचा निर्णय सिद्ध होत आहे. या विशाल देशाला बंद करणं सोपं नव्हतं. खूप समस्या होत्या. रोजदारीवर काम करणारे, श्रमिक मजूर, छोटे मोठे उद्योग, व्यापारी या सर्वांवर संक्रांत येणार होती. पण आपल्या देशाने ते हिमतीने झेलले. लॉकडाऊन चालू झाल्यावर सगळ्या स्वयंसेवी संस्था सक्रिय झाल्या. संपूर्ण देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक पहाडासारखे उभे राहिले. प्रारंभी केरऴमध्ये लागण झालेल्यांची संख्या वाढत होती. तेव्हा तेथील रुग्णालये स्वच्छ करण्यापासून ते जम्मू आणि देहरादूनमध्ये अडकलेल्या मजुरांना भोजन देण्यापर्यंत संघ स्वयंसेवकांनी सेवेचे जबरदस्त नेटवर्क उभे केले. महाराष्ट्र आणि राजस्थानसारख्या अनेक ठिकाणी सरकारी यंत्रणेने संघ स्वयंसवेकांकडे मदत मागितली. भोजनाची व्यवस्था होत गेली. सरकारी यंत्रणा उभी होत होती. पण आपला देश केवळ सरकारी यंत्रणेवर चालत नाही. एकशे तीस कोटी जनता ही या देशाची ताकद आहे. अशाच प्रसंगांमध्ये सिद्ध होते, की हा केवळ नदी, नाले, डोंगर, मैदान, शेत आणि मळ्यांचा देश नाही, हा एक जीवंत राष्ट्रपुरुष आहे!
शहरांतील अपार्टमेंटमध्ये काम करणारे सुरक्षा कर्मचारी, सफाई कर्मचाऱ्यांना रोज चहा, नाष्टा, जेवण मिळू लागले. अनेक ठिकाणी सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान झाला. पंजाबमध्ये त्यांच्यावर पुष्पवर्षाव झाला. अनेक चौकांमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांना नाष्टा-पाणी पोचवण्यात आले.

पोलिस कर्मचाऱ्यांनीही कमालीची संयम दाखवला. शहरांतून आपल्या गावी परतणाऱ्या मजुरांना संघ स्वयंसेवकांनी, पोलिस कर्मचाऱ्यांनी जेवण दिले. त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था केली. जिथे शक्य झालं तिथे त्यांना गावापर्यंत पोचवण्याची व्यवस्थाही केली. एका ठिकाणी तर सुमारे एक हजार किलोमीटर चालून आलेल्या मजुरांच्या पायातील भेगा पाहून पोलिसांची मने भरून आली. त्यांनी स्वतः त्या मजुराच्या पायाला मलम लावले!

होय, हा भारत आहे!

शेकडो किलोमीटर पायी चालून आपली गावी पोचणारे मजूर असतील, किंवा मग आपला मोठा उद्योग-व्यवसाय बंद करून घरात बसलेला उद्योगपती. सायकल रिक्षा चालवणारे श्रमिक असतील किंवा रस्त्यावर व्यवसाय करणारा, रोजच्या रोटीची चिंता करणारा एखादा गाडीवाला या सर्वांना त्रास जरूर झाला खूप जास्त झाला. पण, कोणीही सरकारला शिवी दिली नाही. सरकारच्या विरोधात दगडं नाही उचलली. दुकानं नाही लुटली.

उलट, २१ मार्चचा जनता कर्फ़्यू असो किंवा २२ मार्चचे आभार प्रदर्शन किंवा मग ५ एप्रिलच्या रात्री नऊ वाजता एकजूटीचे दीप प्रज्वलित करण्याचं पंतप्रधान मोदीजींचं आवाहन असो या देशातील जनतेने जी एकता दाखवली, तिने जगात इतिहास रचला. हे सगळं अद्भुत होतं. फुटपाथवर छोटीसी झोपड़ी असो किंवा मोठे महाल, कोठ्या, राजभवन, अपार्टमेंटस असो सगळा देश त्या दिवशी एकाच वेळेस झगमगत होता!

भारताचा राष्ट्रपुरुष जागा होत आहे. यानंतर जगाचे दोन भाग असतील – कोरोनाच्या आधीचा आणि कोरोनाच्या नंतरचा! या कोरोनानंतरच्या भागात आपण इतिहास घडवणार आहोत. सगळं जग एका वेगळ्या नजरेनं आपल्याकडे पाहिल.

होय, कारण हा भारत आहे!